शहरातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता – सुप्रिया सुळे
शहरातील प्राथमिक शिक्षणाची गुणवत्ता – सुप्रिया सुळे
शहरी भागातील लोकसंख्येची, आणि त्यामुळेच या भागातील प्राथमिक शिक्षणाचीही सर्वात महत्त्वाची दोन वैशिष्ट्ये म्हणजे विविधता आणि विषमता. विविध भाषांमध्ये, शाळांमध्ये सुरू असलेले वेगवेगळ्या शिक्षण मंडळांचे अभ्यासक्रम, शाळांच्या व्यवस्थापनांचे विविध प्रकार अशा अनेक बाबतीत महापालिका क्षेत्रात कमालीची विविधता आढळून येते. त्याचबरोबरच शाळेत येणार्या मुलांचा आर्थिक स्तर, शाळांचा शैक्षणिक स्तर, शाळांकडे उपलब्ध असलेल्या सुविधा याबाबतीत कमालीची विषमता आढळून येते. ग्रामीण भागाच्या तुलनेत शाळांकडे उपलब्ध असलेल्या
महाराष्ट्र हे देशातील फार मोठ्या प्रमाणावर नागरीकरण झालेले राज्य आहे. २००१ च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील शहरी लोकसंख्येचे प्रमाण ४२% एवढे होते. शहरी भागातील लोकसंख्या वाढीचा हा वेग असाच कायम राहिला तर (आणि हा वेग कमी व्हायला कोणतेही कारण दिसत नाही) या पुढच्या काळात शहरी भागातील प्रमाण ग्रामीण भागापेक्षा जास्त होईल.
प्राथमिक शिक्षणाच्या गुणवत्तेविषयी आपण ज्या ज्या वेळी बोलतो, विचार करतो त्या त्या वेळी प्रामुख्याने ग्रामीण भागातील शिक्षणच आपल्या नजरेसमोर असते आणि ते स्वाभाविकच आहे. पण महाराष्ट्रासारख्या राज्यासाठी ते पुरेसे नाही. महाराष्ट्रासारख्या राज्यात नागरी क्षेत्रातील प्राथमिक शिक्षणाचे प्रश्न मोठे आहेत, त्यांचे स्वरुप ग्रामीण भागातील शिक्षणाच्या प्रश्नांपेक्षा खूपच वेगळे आहे आणि त्यांचा स्वतंत्रपणे विचार करण्याची गरज आहे हे विचारात घेतले जात नाही.
