NEWS

समृद्ध करणारा प्रवास

महाराष्ट्र टाईम्सच्या महिला दिनाच्या गेस्ट एडिटर म्हणून लिहिलेला लेख


घरापासून ते संसदेपर्यंतच्या आजवरच्या माझ्या प्रवासावर एक नजर टाकताना सर्वप्रथम मला आठवण येते ती माझ्या आजीची. आजी शारदाबाई पवार खेड्यातील सामान्य कुटुंबात वाढलेली महिला. शिक्षण फारस नसल तरी तिची वैचारिक क्षमता काळाच्या पुढे होती. बाबांच्या ११ भावंडाना (७ मुलगे ४ मुली) वाढवण्यासोबतच उत्तम संस्कार अन शिक्षण तिने दिलं. एकत्र राहण्यातच कुटुंबाची शक्ती असते हा मौलिक संस्कार तिने सर्वांच्या मनात रुजवला एवढंच नाही ,तर वयाच्या सव्विसाव्या वर्षी ती पुणे जिल्हा लोकल बोर्डावर सदस्य म्हणून निवडून गेली होती. घर , संसार आणि समाजकारण यांचा सुरेख संगम तिने साधला होता.

माझ्या आजीला (आईच्या आईला) वयाच्या २८ व्या वर्षी वैधव आलं. तिला चार मुली त्यात माझी आई सर्वात थोरली. पुण्यातल शहरी माध्यम वर्गीय कुटुंब होत ते. माझ्या आजीन अतिशय समर्थपणे चारही मुलीचं शिक्षण आणि लग्नाची जवाबदारी पार पडली. तिला जावई देखील कर्तुत्वान मिळाले. माझ्या दोन्ही आज्यांकडून मी बराच काही शिकलेय.

बाबांचं लग्न जेव्हा ठरत होत तेंव्हा बाबांनी माझ्या आईला एकच अट घातली होती , आपल्याला एकाच मूलं हव , मग तो मुलगा असो की मुलगी ! आणि त्यानुसार माझ्या जन्मानंतर मी एकुलती एक मुलगी आहे. असा विचारही न करता त्यांनी कुटुंब नियोजन केल. ४३ वर्षापूर्वी त्यांनी हा निर्णय घेतला... अशा कुटुंबात माझी जडणघडण झाली याचा मला मनापासून आनंद आणि अभिमान वाटतो. माझ्या घरात अतिशय मोकळं आणि प्रगत वातावरण आहे.मुलगा मुलगी असा भेद घरात कधीच नव्हता. कुठलाच संकुचितपणा आमच्या संस्कारात नाही. माझ्या कुटुंबानं मला पुरेस स्वातंत्र दिलं.

घरात मला स्वताचे निर्णय स्वतः घेण्याच पूर्ण स्वातंत्र होतं.अमुकच शिकल पाहिजे , तमुकच  झाल पाहिजे , अशी कसलीही सक्ती कधीच झाली नाही. नं शिक्षणाबाबत , नं लग्ना बाबत. माझ्या आयुष्याचे सगळे निर्णय मीच घेतले आणि त्या पाठीशी आई बाबा आणि कुटुंबीय भक्कमपणे उभे राहिले. माझ्या सगळ्या वहिन्याही त्यांच्या आवडीच करियर करण्याची आणि त्यांच्या आयुष्यातले निर्णय स्वतंत्रपणे घेण्याची मोकळीक मिळाली.

माझी आई प्रतिभा पवार. साधी राहणी आणि कणखर जीवननिष्ठा हे तिच्या व्यक्तिमत्वाच खास वैशिष्ट्य. सदैव घराबाहेर असलेल्या बाबांचा संसार व्रतस्थ भावनेने आईने सांभाळला. नात्यागोत्यातीलच नव्हे , तर कार्यकर्त्यांचीही सुखदु:ख समजून घेतली. त्यांना मायेच्या ओलाव्याने जपलं. जमिनीवरच्या वास्तवाची तिला विलक्षण जाण आहे. बाबांच्या यशान ती कधीही हुरळून गेली नाही , आणि अपयशान निराश झाली नाही.

बाबा अनेकदा मुख्यमंत्री झाले. पण घरातलं सगळ समान घेवून आम्ही ‘वर्षा’ वर राहायला गेलो अस कधीच घडलं नाही. आईचं सांगण असे, तिथलं राहणं काही कायमस्वरूपी नाही. आपलं घर ते आपलं घर. त्यामुळे आम्ही बोचक्यांमध्ये आवश्यक ते सामान बांधून घेवून जायचो. वेळ येईल तेंव्हा ते बरोबर घेवून बाहेर पडायचो! सत्ता असल्या नसल्याचा विचारच तिने कधी आमच्या मनाला शिवू दिला नाही. सुदैवानं बाबांचा जनसंपर्क इतका दांडगा की, सत्ता नसली तरी कार्यकर्त्यांचा राबता कधी कमी झाला नाही. राजकीय आयुष्यात बाबांवर अत्यंत बिकट प्रसंग आले. तरीही त्याने आम्ही डगमगलो नाही. राजकारणात चढउतार असणारच, असं आम्ही सगळे मानतो. दुसरं म्हणजे कोणत्याही समस्सेतून बाबा यशस्वी मार्ग काढणारच, याची खात्री. बाबांनीही राजकारणातील कितीही गुंतागुंतीचा प्रसंग असला तरीही तो जेवणाच्या टेबलावर कधीच येवू दिला नाही.बाबांच्या राजकीय जीवनातील व्यग्रतेमुळे महिन्यातील २० -२५ दिवस ते घराबाहेरच असतं. परंतु तरीही घरात त्याचं नीट लक्ष असायचं, हे आठवत.

कॉलेजात मी खूप लाजाळू आणि अंतर्मुख होते. जवळच्या चारपाचच मैत्रिणी होत्या. माझ शालेय शिक्षण नाना चौकातील सेंट. कोलंबस हायस्कूल मध्ये झालं. नंतर जयहिंद कॉलेजला मायक्रोबायोलॉजी मध्ये बी. एससी. बसने प्रवास आणि आठवड्याला दहा रुपयांचा पॉकिट मनी ठरलेला ! बाबा मुख्यमंत्री असतानाचा काळ आहे हा. माझ्या बहुतेक घट्ट मैत्रिणी गिरगावमध्येच राहणाऱ्या. अमुक एकच करियर कर , अस आमच्या घरातून कधीच आग्रह नव्हता. दहावीला ७८ टक्के मार्क्स मिळाल्यावर सायन्सला जायचं मीच ठरवल. आई बाबांनी हे निर्णय माझ्यावरच सोपवले होते. बारावीनंतर मेडीकल बद्दलची भीती आणि इंजिनियरिंग बद्दलची नावड यातुंन मधला मार्ग म्हणून मायक्रोबायोलॉजी निवडलं.

मी बॅडमिंटन खेळायचे. शाळेत असताना स्वीमिंगची चॅम्पियन होते. पियानोच्या परीक्षा ही दिल्या होत्या. खूप छान आणि सुंदर दिवस होते ते ... पुस्तकच वाचन आमच्याकडे खूप. Stand बुक स्टॉल ला भेट देण हा आमचा कौटुंबिक सोहळा असायचा. आम्ही तिघेही तिथे जायचो तास दोन तास पुस्तकात हरवायचो. चरित्र , कॉफी टेबल बुक्स , हलकी फुलकी पुस्तकं अस मी वाचायचे. मराठी वाचन फारस नव्हतं.नाटकं मात्र खूप बघायचे. घाशीराम कोतवाल , सखाराम बाईंडर यासारखी नाटकं बाबांसोबत पहिली. मराठी सिनेमांमध्ये ‘सिंहासन’ हा माझा ऑलटाईम आवडता सिनेमा आहे. ३३ वर्षापूर्वीचं सिनेमा , पण आजही तीच परिस्थिती आहे. तसाच दुष्काळ ,तसेच राजकारण. इंग्रजी सिनेमे खूप आवडायचे.”गॉन विथ द विंड” ने मी प्रचंड प्रभावित झाले होते. इराणी सिनेमेही मला आवडतात. मी पंधरवड्यातून एखादा छानसा सिनेमा किंवा नाटक बघतेच.

कॉलेजनंतर एक वर्ष मी पुण्याला काकांकडे राहिले. त्यादरम्यान ‘सकाळ’ वृत्तसमूहात नोकरीही केली. त्यापुढच्या वर्षी सदानंद आणि मी एका फॅमिली फ्रेंडकडे भेटलो. आमच अरेंज मॅरेज होतं. दोघांची कुटुंब एकमेकांना ओळखत होती. सहा महिने एकमेकांना समजून घेतल्यावर तेव्हाचे पंतप्रधान चंद्रशेखर आणि शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पुढाकाराने आमचं लग्न झालं. सदानंद बरोबर अमेरिकेत गेल्यावर वर्षभर मी बर्कले युनिवर्सिटीत होते. तिथं जलप्रदुषणावर  मी एक पेपरही सादर केला होता. नंतर सदानंदच्या  बदलीमुळे आम्ही सिंगापूरला आलो आणि शिक्षण थांबलंच. Post Graduation पूर्ण करायला हव होतं. अस मला आजही वाटतं. त्यानंतर काही वर्ष जकार्ताला राहून दहा वर्षा पूर्वी आम्ही भारतात परतलो. आता १४ वर्षाची रेवती आणि ११ वर्षा विजय अशी आमची दोन अपत्ये आहेत. शैक्षणिक असो , सामाजिक असो व राजकीय कार्य , प्रत्येक वेळी माझ्या पतींनी मला प्रोत्साहन दिलं. सदानंदचं शिक्षण भारतात आणि अमेरिकेत झालं. तो इकोनोमिस्ट आहे. सासरे भालचंद्र सुळे अमेरिकेतल्या एमआयटी चे पदवीधर, तर आजेसासरे एम. डी. भट महाराष्ट्राचे पहिले मुख्य सचिव. सासुबाई शाशि भट भारतीय बॅडमिंटन संघाचे प्रतिनिधित्व करायच्या. माहेर व सासर दोन्हीकडे वैचारिकदृष्ट्या समृद्ध परिवार माझ्या वाट्याला आला. रेवती आणि विजय ही दोघं म्हणजे माझ्यासाठी आनंदाचा ठेवा आहे. खासदार असल्याने मतदारसंघ आणि दिल्लीत खूप वेळ जातो. कामाचा व्याप प्रचंड वाढतो आहे. यात मुलांचा अभ्यास घेणं , त्यांच्या सोबत वेळ घालवणं खूप कठीण जातं. पण रविवार मी कटाक्षानं मुलांसाठी राखून ठेवते. त्यांचा अभ्यास घेणं , बाहेर फिरायला जाणं किंवा त्यांच्या आवडीचा सिनेमा त्यांच्यासोबत बघणं असाच दिनक्रम असतो.

माझी आई आणि माझे पती माझ्या अनुपस्थितीत रेवती आणि विजय यांचा संपूर्ण ताबा घेतात. त्याच श्रेय त्यांना द्याव तितकाच रेवती आणि विजयलाही द्यायला हवं. कारण आपली आई आता वेगळ्या कामात आणि जबाबदाऱ्यांमध्ये गुंतत चालली आहे , हे ते दोघही समजून घेतात. अजितदादा आणि माझ्यातलं नातं कोणत्याही एकत्र कुटुंबात वाढलेल्या , सामान्य घरातल्या बहिण भावाच असतं तसंच आहे. पवार साहेब आणि दादा यांच्या मार्गदर्शनाखाली माझी राजकीय, सामाजिक घडण होते आहे. दिवाळीच्या दिवसात आम्ही सगळे पवार कुटुंबीय एकत्र जमून धमाल करीत असतो. दादाचा त्यातला सहभाग खासच असतो. राजकारण आणि वैयक्तीक आयुष्यात आम्ही कधीच गल्लत करीत नाही. दादा मार्गदर्शक म्हणून आणि माझा दादा म्हणून नेहमीच माझ्या पाठीशी खंबीरपणे उभा असतो. एक कर्तुत्ववान मोठा भाऊ म्हणून मला त्याचा नेहमीच अभिमान वाटतो.

परदेशातून भारतात परतले तेंव्हा अवतीभोवतीच्या प्रश्नांनी अस्वस्थ झाले. वाढत्या लोकसंख्येचा भस्मासूर, ग्रामीण भागातील शिक्षणाची आबाळ, पाण्यासाठीची वणवण... अश्या अनेक गोष्टी पाहून त्यावेळी मला समाजकारणात उतरावेसे वाटू लागले. मी तेंव्हा माझ्या आवडीच्या क्षेत्रात म्हणजे लहान मुलांसाठी कामाला सुरवात केली. काही कामे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या मार्फत , तर काही लक्ष्मण मानेंच्या सोबत आश्रम शाळांमधून. नंतर ‘पवार पब्लिक चारीटेबल ट्रस्ट’ मार्फत मुंबई पुण्यामध्ये उत्तम दर्जाच्या शाळा सुरु केल्या. यामागे उद्देश होतं तो विध्यार्थ्यांना सर्वोत्तम सुविधा आणि शिक्षण पद्ध्तींसह दर्जेदार शिक्षण देणं. चव्हाण प्रतिष्ठानचे संचालक पद सांभाळायला सुरवात केल्यानंतर मी शाळकरी मुलांसाठी ‘सृजन’ हा सर्जनशील उपक्रमांचा कार्यक्रम सुरु केला.

याचवेळी मी अपंगांसाठी काम सुरु केल. अपंगाच्या क्रीडा स्पर्धा ,उच्च आणि तंत्र शिक्षणातील त्यांचा सहभाग ,कृत्रिम अवयव /साधन वाटप ,त्यावरील जकात माफीचा प्रश्न असे विविध विषय मला हाताळायला मिळाले. महाराष्ट्रातील अपंगाच्या विकासासाठीच एक निश्चित धोरण व्हावं, म्हणून त्याचा आराखडा आम्ही शासनाला नुकताच सादर केला.

ग्रामीण भागातील महिलांना आर्थिकद्रष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि त्यांच्या श्रमाला आर्थिक प्रतिष्टा मिळवून देण्यासाठी ‘यशस्वीनी सामाजिक अभियानाची ’सुरुवात, प्रतिष्ठानच्या ‘नव महाराष्ट्र युवा अभियाना ‘ तर्फे राज्याचे युवा धोरण साकारणे आणि विविध कार्यक्रमामार्फत तरुणाईशी सातत्याने संवाद साधने असे अनेक उपक्रम सुरु होते. समाजकारणात अभ्यास सुरु असताना राजकारणात अभावितपणे माझा प्रवेश झाला.

राज्यसभेवर काम करण्याची संधी मला राष्ट्रवादी काँग्रेस च्या माध्यमातून मिळाली आणि मी दिल्लीत गेले .राज्येसभेनंतर लोकसभेवर निवडून गेले. आता बारामती लोकसभा मतदार संघाची लोकप्रतिनिधी म्हणून मी काम करतेय. राष्ट्रीय पातळीवरील राजकारण समजून घेऊन काम करायला मजा येतेय बारामती.. मुंबई.. विदेशातील शहरे... दिल्ली.. माझा आजवरचा प्रवास असा विविधांगी झालं आहे त्या अनुभवाच्या शिदोरीवर वाटचाल करतेय. आजवरचा प्रवास एक माणूस म्हणून समृद्ध करणारा होता ... ही समृद्धी अधिकाधिक वाढत जाईल , ही आशा आहे आणि  ...खात्रीही.

पूर्व प्रकाशित महाराष्ट्र टाईम्स दिनांक ८ मार्च २०१२