NEWS

बस रैपिड ट्रांजिस्ट सिस्टम .(बी.आर.टी.एस:)

नागरिकांना जोडणे आणि विकासनिश्चिती करणे हा सार्वजनिक वाहतुकीमागील उद्देश आहे.

वाढते शहरीकरण ही विकसनशील देशांमधील एक महत्त्वाची वस्तुस्थिती आहे. भारतात विशेषत: मुंबई, कोलकाता आणि दिल्ली यांसारख्या महानगरांमध्ये हे शहरीकरण प्रचंड वेगाने होत आहे. या शहरांची लोकसंख्या आता १,००,००,००० पेक्षा जास्त आहे. चेन्नई, हैदराबाद, अहमदाबाद, बेंगळुरू या शहरांची लोकसंख्या ५०,००,००० पेक्षा जास्त आहे. आणि १०,००,००० पेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या महानगरीय प्रदेश ३५ हून अधिक आहेत. ही संख्या १९९१मध्ये जवळपास केवळ निम्मी होती. शहरीकरणामागील महत्तवाचे कारण असलेल्या आर्थिक आणि पायाभूत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र देशात अग्रेसर आहे. २०११च्या जनगणनेच्या प्राथमिक आकडेवारीनुसार गेल्या दशकभरात शहरी लोकसंख्येत २३% वाढ झाली आहे. तर त्याच दशकभरात एकट्या पुणे जिल्ह्याच्या शहरी लोकसंख्येत ३६.६३% वाढ झाली आहे. आणि या कालावधीत पुण्यतल्या दुचाकींची संख्या तब्बल १२ लाख झाली, तर मोटारींची तब्बल ६०,०००. पुण्यातले रस्ते यापूर्वी कधीही नव्हते तितके आता गजबजलेले आहेत. या शहरीकरणाचा परिणाम दाटीवाटीचे रस्ते, सार्वजनिक आणि पार्किंगच्या जागाची कमतरता, पर्यावरणाच्या समस्या यांमध्ये झालंय. या सगळ्या प्रश्नांना तोंड देऊन पुणेकर नागरिकांची चांगलीच दैना झालीये.

या प्रश्नांवर सगळ्यात स्वाभाविक आणि मूलभूत उत्तर म्हणजे सार्वजनिक वाहतुकीची उत्तम व्यवस्थेवर लक्ष केंद्रित करणे. अनेक पाश्चात्य देश आता अतिप्रगत तंत्रज्ञानावर आधारित मॉडेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करत आहेत. पूर्व युरोपीय, दक्षिण अमेरिकी आणि आशिया-पॅसिफिक प्रदेशातले काही देशांनी आर्थिकदृष्ट्या परवडणारी व्यवस्था विकसित केली आहे. भारतात दिल्लीतली मेट्रो किंवा मुंबईतल्या बेस्ट आणि लोकल व्यवस्थेने सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं उत्तम उदाहरणं घालून दिलेली आहेत. पुण्यातली वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी पुणे महानगर पालिका सातत्याने प्रयत्न करत आहे आणि नवनव्या योजनांचा आणि मॉडेल्सचा विचार करत आहे. पादचाऱ्यांसाठी भुयारी मार्ग, पदपथ, पादचाऱ्यांसाठी खास जागा, पूल, आऊटर रिंग रोड (शहराभोवती जलदगती रस्ते), उड्डाणपूल, जंक्शन आणि पार्किंग सुविधा यासंबंधी सुधारणांवर काम सुरू आहे. मेट्रो आणि मोनोरेलच्या पर्यांयांचाही विचार सुरू आहे.

सर्व पर्यांयांचे काही फायदे आहेत, तर काही तोटे आहेत. आणि शासनाने विविध समित्यांच्या आणि तज्ज्ञांच्या अहवालांच्या माध्यमातून या फायद्या-तोट्यांचे परिक्षण केले आहे.

मोनोरेल: मोनोरेलचा सगळ्यात महत्त्वाचा फायदा म्हणजे त्यासाठी जागा कमी लागते. त्या शांत असतात आणि असलेल्या ट्रॅफिकमध्ये भर घालणार नाहीत. तसेच त्यांमध्ये आकर्षक डिझाईन्स उपलब्ध आहेत. मात्र आपत्कालीन मार्ग, गाड्या आणि रुळांची अनुरुपता, सुरूवातीची गुंतवणूक हे काही अडचणीचे मुद्दे आहेत.

मेट्रो: मेट्रो हा एक आकर्षक पर्याय आहे, विशेषत: आपल्याकडे दिल्ली मेट्रो या जगातल्या सर्वात मोठ्या मेट्रोचं उदाहरण असताना. क्षमता, कार्यक्षमता आणि सुरक्षितता या मेट्रोच्या जमेच्या बाजू आहेत. तर जागा, पायाभूत सुविधांची आवश्यकता आणि उभारणी व कार्यरत राहण्यासाठी लागणारा खर्च ही मेट्रो समोरची काही महत्त्वाची आव्हाने आहेत. पुणे शहराची वाढ पाहता, मेट्रो हा दूरगामीदृष्ट्या चांगला पर्याय ठरू शकेल.

बस वाहतुकीचा विस्तार: - नव्या वाहतूक व्यवस्थेत गुंतवणूक करण्याआधी सध्या उपलब्ध असलेल्या बस सेवेचा विस्तार करून त्याचा वापर आणि परिणामकारकता वाढवणे हा वाहतूकचा प्रश्न सुधारण्यासाठी प्राथमिक स्तरावरचा उपाय आहे.

बी.आर.टी.एस (बस रॅपिड ट्रान्झिट सिस्टिम): सार्वजनिक वाहतुक व्यवस्थेच्या फेऱ्या वाढवण्यासाठी एक यशस्वी पर्यायांपैकी एक म्हणजे बी.आर्.टी.एस्. या पद्धतीनध्ये बसेससाठी ठरवून दिलेल्या लेनमध्ये इतर वाहनांना प्रवास करण्यास मनाई असते. यासाठी सर्वंकष व्याप्ती, बसेचा अग्रक्रम आणि इतर उपलब्धता या सर्व बाबींचा योग्य पुरवठा झाला पाहिजे. अहमदाबादसारखी शहरं जवाहरलाल नेहरू राष्ट्रीय नागरी पुनर्निर्माण (JNNURM) अभियानांतर्गत यशस्वी मॉडेल राबवणारे शहर म्हणून पुढे येत आहेत. बी.आर्.टी.एस् च्या पुण्यातल्या चाचणी प्रकल्पातून आपणही बरंच काही शिकलो आहोत. बी.आर्.टी.एस् प्रकल्पाचे पुनरावलोकन केले पाहिजे, असं आपण निश्चितच म्हणू शकतो. आणि यावेळी त्यात स्थानिकांच्या मतांचा आणि निरीक्षणांचा समावेश असावा. बी.आर्.टी.एस् चा अवलंब जगभरात अनेक देशांनी केला आहे. यामागे त्यासाठी लागणारे मर्यादित भांडवल हा महत्त्वाचा मुद्दा आहे. बोगोटा, क्विटो, जकार्ता, बीजिंग, साओ पावलो आणि मेक्सिको या शहरांमध्ये बी.आर्.टी.एस् पद्धती प्रभावीरित्या अंमलात आणलेली आहे. जे.एन्.एन्.आर्.यु.एम् ने बी.आर्.टी,एस् ला प्रोत्साहन दिले आहे. केंद्रिय नगरविकास मंत्रालयानेजे.एन्.एन्.आर्.यु.एम् च्या दुसऱ्या टप्प्यात राज्य व शहरांना बी.आर्.टी.एस् पद्धतीचा अवलंब करण्यासाठी काही इनसेन्टिव्ह्ज देण्याची योजना जाहीर केली.

सार्वजनिक वाहतुकीच वापर करण्याचे प्रमुख कारण म्हणजे वाढत्या खासगी वाहनांच्या संख्येमुळे कार्बनच्या वाढत्या उत्सर्जनामुळे पर्यावरणाचा होणारा ऱ्हास. त्यामुळे मला वाटतं, ही आपल्यापैकी प्रत्येकाचीच जबाबदारी आहे, की दूरगामी विकासाचा विचार करताना वातावरण बदलाचाही आपण विचार केला पाहिजे. चला तर मग, आपण सगळे मिळून आपल्या शहराची वाहतूक सुधारायला शासनाला मदत करुया.

मला वाटतं, की शहरांचे अग्रक्रम वेगवेगळे असतात. शहरात आर्थिक स्तर, नागरिकांच्या गरजा आणि त्यांची मतं यामध्येही बरीच विविधता असते. आणि म्हणूनच पुणेकर नागरिकांना त्यांचे अनुभव आणि मतं व्यक्त करण्याचं मी आमंत्रण देते. यामुळे आपल्याला लोकांच्या सोयीची आणि प्रभावी वाहतूक व्यवस्था निर्माण करता येईल, याची मला खात्री आहे.

तुमच्या सूचना आणि मतं मला जरूर कळवा.