NEWS

जागर हा जाणिवांचा; तुमच्या माझ्या लेकीचा

क्लिक करा

स्त्रीभ्रूणहत्येविरोधात सुप्रिया सुळेंची पदयात्रा

Jaagar Theme Song

 

Song Writer: Dasu Vaidya
Music Composer: Ashok Patki
Signers: Bela Shende & Urmila Dhangar

 
 
 

Jaagar

गेल्या वर्षी पुण्याहून मुंबईला येत होते तेव्हा २०११ च्या जनगणनेची आकडेवारी हाती आली. ती वाचताना राज्यात मुलांपेक्षा मुलींचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे स्पष्ट दिसत होते. त्याचवेळेला स्त्री-भृण हत्येच्या घटना वृत्तपत्रातून व वाहिन्यांवरून समोर येत होत्या. या सर्व गोष्टीं अस्वस्थ करणार्‍याच होत्या. मुलींचं घटतं प्रमाण आणि स्त्री-भृणहत्या हा विषय आता फक्त चर्चेपुरता मर्यादित राहून चालणार नाही त्यावर प्रत्यक्ष कृतीची गरज निर्माण झाली आहे. सामाजिक क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्त्यांशी यासंबंधी फोनवर चर्चा केली आणि ही परिस्थिती बदलण्यासाठी आपण प्रयत्न करायला हवेत असं वाटू लागलं.

दर १००० मुलांमागे मुलींच्या घटत्या प्रमाणामागे वाढत्या स्त्री-भृणहत्या आहेत हे सांगण्यासाठी आज कोणा तज्ञाची आवश्यकता नाही. खेदाची बाब ही आहे की यात जसे अशिक्षित लोक सहभागी आहेत तितकेच किंबहूना त्याहून जास्तच स्वतःला सुशिक्षित म्हणवणारे लोक पण आहेत. मुलींच्या घटत्या प्रमाणामागे जसा आधुनिक तंत्रज्ञानाचा गैरवापर आहे तसेच स्त्रियांना समाजात मिळणारी दुय्यम वागणूक अणि मुलींची उपेक्षासुद्धा आहे आणि हे फक्त कायद्याने साध्य होणार नाही तर त्यासाठी महिलांची व नागरिकांच्या सक्षम लढ्याची गरज आहे.

आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार मा. यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात महाराष्ट्रासारख्या प्रगत राज्यावर स्त्री-भृणहत्येविरोधी मोहिम राबवण्याची वेळ यावी हे दुर्दैवच म्हणायला हवे. महाराष्ट्रात कृषी व औद्योगिक विकासाचा पाया घालणारा, पंचायत राजच्या माध्यमातून तळागाळातल्या समाजाला त्याच्या लोकशाही ताकदीचे भान देणार्‍या या द्रष्ट्या नेत्याचे कार्य त्यांच्या मृत्युनंतर पुढे नेण्यासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानची स्थापना झाली. याच प्रतिष्ठानमार्फत आज स्त्री-भृणहत्येविरोधात हा जाणीवांचा जागर मांडला आहे.

समाजाकडून प्रतिसाद

मागील वर्षांत महाराष्ट्राने जागर अभियानाला भरभरून प्रतिसाद दिला. प्रभातफेर्‍या, चर्चासत्रे, प्रदर्शने संपूर्ण राज्यभरात आयोजित झाले. माझ्या कार्यालयात स्त्री-भृण हत्येच्या विषयावर अनेक नाटकांच्या संहिता, सिनेमा, लघुपटांच्या सीडीज येतात. चित्रकार या विषयावर चित्र मालिका बनवत आहेत, कवितांची, घोषणांची, गोष्टींची पुस्तके प्रकाशित झाली आहेत. समाज याबाबत बोलतो आहे.

बदल घडतो आहे

नुकत्याच हाती आलेल्या आरोग्य संस्थांच्या अहवालानुसार राज्यातील मुलींचा जन्मदर जो प्रत्येक हजार मुलांमागे ८१३ होता तो ९३१ पर्यंत वाढला आहे. ही खरंतर खूपच आनंदाची बातमी आहे. याचाच अर्थ दर १००० मुलांमागे सुमारे ११८ मुली स्त्रीभ्रूण हत्या किंवा लहानपणी मुलगी आहे म्हणून केले जाणारे दुर्लक्ष यापासून वाचल्या आहेत. हे आकडे अजून मोठ्या सर्वेक्षणातून येणे आणि बदलाची ही प्रक्रीया सतत सुरु ठेवणे आवश्यक आहे.

२०२१ मधील जनगणनेमध्ये मुलींचा संख्या ही १००० मुलांमगे १००० असावी यासाठी सतत प्रयत्नशील राहणे आवश्यक आहे. स्त्री-भृणहत्या व एकूणच महिलांच्या अस्तित्वाच्या प्रश्नांना जनमानसापर्यंत घेऊन जाणे. या कार्यात युवांचा विशेषतः युवतींचा सहभाग मिळविणे व विविध समाजघटकांना या कार्यासाठी एकत्र आणून हा जागर यशस्वी होणार आहे. काम फार मोठं आहे याची मला जाणिव आहे. हजारो वर्षे संस्कृतीच्या नावाखाली जपलेल्या मूल्यांना रातोरात बदलता येणार नाही याची मला जाणिव आहे. परंतु स्वयंसेवी संस्था, नागरीक, युवा, शासन प्रशासन डॉक्टरांच्या संघटना यांच्यासोबतच आपण प्रयत्न सुरू ठेवले तर २०२१ च्या जनगणनेतील चित्र नक्कीच बदलेल अशी मला खात्री वाटते.

चला, आपण सगळे एकत्र आलो, तर फरक नक्की पडेल !


अभियानाअंतर्गत कार्यक्रम

जागर हा जाणिवांचा अहवालासाठी इथे क्लिक करा


नायगाव ते फुलेवाडा पदयात्रा

'जागर' चा हा संदेश पदयात्रेच्या माध्यमातून लोकांच्या गावांपर्यंत आणि शहरांपर्यंत पोचवण्यासाठी पदयात्रा व प्रभातफेर्‍यांचे आयोजन करण्यात आले. दिनांक २५ ऑगस्ट २०११ या दिवशी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे जन्मगाव नायगाव, जिल्हा सातारा ते महात्मा फुले वाडा, पुणे अशा ६० कि.मी. ची पदयात्रा आयोजीत केली. या पदयात्रेची सांगता २८ ऑगस्ट २०११ रोजी पुण्यातील गणेश कला क्रीडा मंच येथे झाली. राज्याच्या विविध जिल्ह्यातील, विविध जाती-धर्मांच्या, गरीब-श्रीमंत ५०० हून अधिक मुलीं जागरच्या एकाच ध्येयाने तीन दिवस एकत्र राहिल्या व जागरचा संदेश देत सतत पायी चालल्या.


पदयात्रा व प्रभातफेर्‍या

पदयात्रा व प्रभातफेर्‍याद्वारे लोकांपर्यंत थेट पोहचता येते, त्यांच्याशी संवाद साधता येतो व विशेष म्हणजे लोकांना सामिल करुन घेता येते. या माध्यमाद्वारे गावात आणि शहरात भारावलेले वातावरण निर्माण करुन संदेश देता आला.
 1. अहमदनगर शहर- प्रभातफेरी-१२ ऑगस्ट २०११
 2. केडगाव पदयात्रा-१३ ऑगस्ट २०११ (रक्षाबंधन)
 3. औरंगाबाद प्रभातफेरी- ५ मार्च २०१२ (जागतीक महिला दीन कार्यक्रम)
 4. औरंगाबाद पदयात्रा - ३ एप्रिल २०१२
 5. नागपूर पदयात्रा- ५ एप्रिल २०१२
 6. नाशिक पदयात्रा- ११ एप्रिल २०१२

या पदयात्रा व प्रभात फेऱ्यांदरम्यान युवतींची उपस्थिती लक्षणीय होती. वैद्यक क्षेत्रातील इंडियन मेडिकल असोसिएशन, होमिओपॅथिक, आयुर्वेदीक, प्रसुती व बालरोगतज्ञ तसेच रेडिओलॉजिस्ट अशा विविध क्षेत्रातील संघटना तसेच शासनाच्या आरोग्य विभागातील सहकारीसुद्धा या पदयात्रांमध्ये सहभागी झाले. स्त्री-भृणहत्येविरोधी प्रत्यक्ष कृती करु शकतील असे वेगवेगळे समाजघटक एकत्र आलेले दिसले. नर्सिंग महाविद्यालयाच्या व वैद्यकिय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थीनीं, विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी असे संबंधीत युवा गट हा संदेश जनतेपर्यंत घेऊन जाताना दिसले. पदयात्रेच्या सुरुवातीलाच कर्तुत्ववान महिलांच्या रुपात चिमुकल्या मुलीं होत्या. विविधरंगी पोषाख, स्त्री-भृणहत्या विरोधी फलक, भविष्यात उद्भवू शकणार्‍या परिस्थितीचे नाट्यमय चित्रण, घोडे, लेझिम पथक यामुळे अनेक पदयात्रांना शोभायात्रेचे स्वरुप आले व प्रत्येकाला आकर्षित करीत पदयात्रा पुढे जात होत्या.


स्पर्धा व प्रदर्शने

 1. आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धा- औरंगाबाद- दि. ८ ऑगस्ट २०११ वक्तृत्व स्पर्धा
 2. खुली पथनाट्य स्पर्धा-दि.१० ऑगस्ट २०११ पथनाट्य स्पर्धा
 3. चित्रकला स्पर्धा व पोस्टर प्रदर्शन- दि.१६ व १७ ऑगस्ट अहमदनगर निबंध व चित्रकला स्पर्धा
 4. चित्र प्रदर्शन व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसोबत चर्चा- औरंगाबाद ऑक्टोबर २०१२
 5. रांगोळी प्रदर्शन, औरंगाबाद -११,१२,१३ डिसेंबर २०११
 6. पथनाट्य – मुलगी वंशाचा दिवा – कार्यशाळा- बदलापूर


बैठका आणि पाठपुरावा

स्त्री-भृणहत्येच्या संदर्भात कायद्यांची व त्यांच्या अंमलबजावणीची नेहमीच मागणी होत असते व याचा रोख हा साहजिकच डॉक्टर्सकडे जास्त असतो. त्याचवेळी या कायद्यांमुळे आपल्यामागे कायद्याचा ससेमिरा लागेल की काय अशी धास्ती प्रामाणिक डॉक्टरांना पण वाटते आणि ती त्यांच्या संघटनेतर्फे व्यक्त होते. स्त्री-भृणहत्येला आळा बसण्यासाठी प्रभावी कायदा तर हवाच परंतू त्याचा जाच प्रामाणिक डॉक्टरांना बसू नये अशीच सर्वांची भावना आहे. याच विषयावर जागर चे सदस्य, राज्यातील या विषयावर काम करणार्‍या स्वयंसेवी संस्था, ५० डॉक्टरांचे पथक व शासन व्यवस्था यांमध्ये सुसंवाद घडवून आणला

 1. महाराष्ट्र शासनासोबत बैठक 14 सप्टेंबर 2011, मुंबई
 2. स्वयंसेवी संस्था व डॉक्टरांची परिषद- मुंबई
 3. डॉक्टरांची परिषद- अहमदनगर


विशेष ग्रामसभा-अहमदनगर- २ ऑक्टोंबर २०११

अहमदनगर जिल्ह्यातील सारोळा कासार, ता. अहमदनगर ग्रामपंचायतीच्या वतीने गांधीजयंती निमित्त विशेष जाहीर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या दरम्यान पथनाट्याचे सादरीकरण व प्रभातफेरीचे आयोजन केले होते. याद्वारे वातावरण निर्मिती केल्यानंतर स्त्री-भृणहत्याविरोधी ठराव सादर करण्यात आला ज्याद्वारे ग्रामपंचायत जागर अभियानात सामिल होत असल्याचे जाहीर करण्यात आले. सुमारे ३००० ग्रामस्थांनी हा ठराव एकमताने पारित केला. इतर ग्रामपंचायतींना देखील या प्रकारचा ठराव पारित करण्याचे आवाहन करण्यात आले. याला सकारात्मक प्रतिसाद देऊन अहमदनगर तालुक्यातील ६२ तर पारनेर तालुक्यातील ७९ ग्रामसभांनी अशा एकूण १४१ ग्रामपंचायतींनी हा ठराव पास केला.


स्त्री-भृणहत्येसंबंधी दोषी डॉक्टरांवर कारवाई

बीड जिल्ह्यातील डॉ. सानप यांच्यावर स्त्री-भृणहत्येसंबंधी गुन्हा दाखल झाल्याची बातमी मिळाली. समाजात यापुढे अशा अनिष्ठ गोष्टी खपवून घेतल्या जाणार नाहीत हे दर्शवण्यासाठी नवभारत युवा आंदोलनाचे कार्यकर्त्यांनी सुबोध जाधव यांच्या नेतृत्वाखाली हॉस्पिटल परिसरात निदर्शने केली व या गोष्टीचा निषेध नोंदवला.


बीड दुर्घटनेच्या बळींचे पुनर्वसन

विजयमाला पटेकर यांना चार मुलींनतरच्या पाचव्या प्रसुतीदरम्यान स्त्री-भृणहत्या करताना मृत्यु आला. या गुन्ह्याखाली त्यांच्या पतींना अटक झाली व चार चिमुकल्या मुलीं फक्त वृद्ध आजी-आजोबासोबत घरी राहिल्या. अशा वेळी समाजाकडून त्यांना मदतीचा हात मिळणे आवश्यक होते. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानने तीन थोरल्या मुलींच्या आरोग्याची व शिक्षणाची जबाबदारी उचलली व त्यांना बारामती येथील वसतीगृहात प्रवेश मिळवून दिला. त्याचबरोबर वृद्ध आजी-आजोबा व त्यांसोबत राहत असलेल्या २ वर्षे वयाच्या मुलीसाठी मुलभूत गरजांची तरतूद गावातच केली.


सुप्रिया लेक लाडकी योजना

जागर कार्यक्रमाने प्रेरीत होऊन सोलापूर जिल्हा सहकारी बॅंक लि. ने त्यांच्या सामाजिक कार्याचा भाग म्हणून सुप्रिया लेक लाडकी योजना जाहीर केली. या योजने अंतर्गत महिलाच्या नावे ठेवण्यात आलेल्या ठेवींवर सामान्य व्याज दरापेक्षा ५०%  अधिक व्याजदर देऊ केले. या योजनेमुळे मुलींच्या भविष्याची तरतुद करण्यासाठी त्यांच्या नावावर ठेव ठेवण्यास पालकांना प्रोत्साहन मिळाले.


मुलींच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक मदत

इंदापूर तालुक्यातील मातापित्यांच्या मृत्युमुळे शाळा सोडण्यास भाग पडलेल्या मुलांना पुन्हा शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी भावनीक व आर्थिक मदतीचा हात पुढे केला. मुलांबरोबरच त्यांची जबाबदारी असलेल्या वृद्ध मातापित्यांच्यादेखील मुलभूत गरजांची पूर्तता होईल असे पाहीले. अशा अनेक मुलींच्या शिक्षणाची जबाबदारी घेण्यासाठी जागर अभियानाअंतर्गत कार्यकर्ते पुढे आले आहेत.


कोल्हापूर पॅटर्न

सोनोग्राफी मशिनची निरीक्षणे, फोटो स्वरुपात नोंदवून त्याबरोबरच गर्भवती महिलेचे नाव, पत्ता, वय, आणि पुर्वीची प्रसुतीची माहीती देखील नोंदवणारे जोडणी यंत्र पुणे येथील एका कंपनीने तयार केले. हे यंत्र कोल्हापूर जिल्ह्यात त्याच्या चाचणीसाठी बसवले गेले. अशाप्रकारे प्रत्येक सोनोग्राफी यंत्राची माहीती मुख्य सर्व्हर द्वारे थेट जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त होण्याची सोय केली. या यंत्र जोडणी द्वारे गर्भारपणातील प्रत्येक तपासणीवर त्याचबरोबर खऱ्या खोट्या रीपोर्टवर प्रशासनाची प्रत्यक्ष देखरेख सुरु झाली आहे. या यंत्राची उपयुक्तता आणि कंपनीच्या दाव्याची सत्यता पडताळून पाहून अशीच सोय संपूर्ण महाराष्ट्रात करता येईल काय याची जागर चे सदस्य अभ्यास करीत आहेत.  


जागर लघुपट

एखादा विषय थेट भिडावा यासाठी लघुपट-चित्रपट हे प्रभावी माध्यम आहे. हेच लक्षात घेऊन जागर हा जाणिवांचा या लघुपटाची निर्मिती केली. प्रतिथयश दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात डॉ. अमोल कोल्हे यांनी प्रमुख भुमिका केली. प्रशांत दळवी यांची स्त्रीभ्रूण हत्येवरची कथा प्रेक्षकांना विचार करायला प्रवृत्त करते. या चित्रपटाचे खेळ जागरच्या अनेक कार्यक्रमांत आणि युवती मेळाव्यांत झाले. त्याच बरोबर शाळा, महाविद्यालये आणि विविध सांस्कृतीक कार्यक्रमांतून देखील हा लघुपट हजारो युवतींपर्यंत पोहोचला.

जागर लघुपट भाग एक साठी इथे क्लिक करा

जागर लघुपट भाग दोन साठी इथे क्लिक करा


नकोशी लघुपट

एकामागोमाग एक मुली होत असतील तर त्यातील एखाद्या मुलीचे नाव नकोशी किंवा नकुसा (नको असलेली) ठेवणे महाराष्ट्रातील काही भागात नवीन नाही. काही जण म्हणतात मुलीचे नाव नकुसा ठेवले तर त्यानंतर मुलगा होतो... घोर अंधश्रद्देचा हा अस्सल नमुना आहे. पण यापोटी मुलींना हीच ओळख घेउन आयुष्य कंठावे लागते. सातारा जिल्ह्यात अशाच शेकडो मुलींचे पुन्हा नामकरण करुन मुलींच्या व पालकांच्या आवडीची नावे देण्यात आली. अशाच मुलींची घुसमट आणि नाव बदलल्यानंतरचे त्यांचे अनुभवांचे चित्रण या लघुपटात करण्यात आले आहे.


पुस्तीकांचे प्रकाशन

स्त्रीभ्रूण हत्येच्या विषयावर काम करताना आमच्यासमोर आदर्श होता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आणि राजमाता जिजाऊंचा आणि शिकवण होती ताराबाई शिंदची हाच आदर्श आण हीच शिकवण तळागाळापर्यंत पोचावे म्हणून या तीन आदरणीय व्यक्तीमत्वांवर आधारीत पुस्तीकांचे प्रकाशन व वाटप केले. त्याच बरोबर स्त्रीया व युवतींचे आरोग्य, त्यांच्यासाठीचे कायदे व योजनांची मार्गदर्शक पुस्तिकाही प्रकाशीत केली. अडीअडचणीतील स्त्रीयांना मदत व्हावी म्हणून राज्यभरातील संस्थांची यादी असलेली संवादीनी ही पुस्तीकाही युवतींना मार्गदर्शक ठरली. ही पुस्तके आज महाराष्ट्रातील सुमारे ४०,०००० युवतींपर्यंत व त्यांच्या कुटुंबापर्यंत पोहोचली.


बदल घडतो आहे....

 1. आज मुलींची संख्या महाराष्ट्रात कमी होते आहे अणि त्याचे दुरगामी परिणाम खूप वाईट असणार आहे असे समाजमानस तयार झाल्यासारखे वाटते.
 2. याआधी काही शहरी नागरिक आणि सामाजिक संस्थांमध्ये चालणारी याबाबतची चर्चा सामान्य व्यक्तींसुद्धा करु लागलेत. पारावर, घरात आणि उंच इमारतींमध्येसुद्धा याबाबत माहीती पोचल्याचे दिसते.
 3. केंद्र व राज्य सरकार मुलींचे शिक्षण, त्यांचे सामाजिक स्थान याबाबत अधिक जागरूक दिसत आहेत. नवनवीन योजना येत आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांसाठीचे आरक्षण ५०% झाले आहे. अधिकाधिक महिला गावाचा कारभार पाहतायत, त्यांच्या ज्ञानाच्या आणि अनुभवाच्या कक्षा रुंदावत आहेत आणि त्याबरोबर त्यांची निर्णयक्षमतासुद्धा वाढतेय.
 4. स्त्री-भृणहत्येसारख्या अनिष्ट रुढींचा लोक धिक्कार करत आहेत. वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने होत आहेत.
 5. कायद्याची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होताना दिसतेय. दोषी डॉक्टरांवर कारवाई होताना दिसतेय. त्याबरोबर सर्व डॉक्टर आपल्या सोनोग्राफी मशीनच्या वापराची माहिती व्यवस्थित नोंदवून ठेवत आहेत.  
 6. अधिकाधिक स्वयंसेवी संस्था मुले, युवक, महिला यांसोबत काम करताना स्त्री-भृणहत्येबद्दल बोलत आहेत. या संस्था एकमेकांकडून समजावून घेत आहेत.
 7. प्रसारमाध्यमें याबाबत महत्वाची भूमिका बजावताना दिसतायत. माहितीचा प्रसार करणे, स्त्री-भृणहत्येच्या घटनेला लोकांपर्यंत पोचवणे अशा जबाबदार्‍या ते पार पाडत आहेत. अनेक प्रसार माध्यमांतून सविस्तर चर्चा करणारे लेख प्रकाशित होत आहेत, चर्चासत्रे प्रसारित होत आहेत.
 8. सर्वात महत्वाचे म्हणजे स्त्री-भृणहत्येविरोधी समाजाचा दबाव डॉक्टर्स, प्रसारमाध्यमें, शासन, प्रशासन या सर्वांवर वाढतो आहे.                         

Interview (Videos)
Please click on link to watch interview

 
   
 
 

News (Print)
Please click on news to read

Pudhari Satara SAKAL Loksatta Divya Marathi Sakal Aurangabad Pudhari
 
 

News (Videos)
Please click on videos to view

Sahyadri Zee 24 Taas star-mazaa IBN lokmat Saam AAJ TAK TV9
 
 

News (Online)
Please click on links to read