NEWS

अपंग व्यक्तींचे हक्क

 यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई अपंग हक्क विकास मंचाच्या वतीने मागील अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या विश्वस्त सुप्रिया  सुळे यांच्या पुढाकाराने अपंग हक्क विकास मंचकार्यान्वित आहे. या मंचाच्या वतीने २००६ पासून महाराष्ट्रातील विविध प्रवर्गातीलअपंगांना सन्मानपूर्ण जीवन जगता यावे करीता अपंगत्वाचा प्रतिबंध, अपंगांचे पुनर्वसन, यासंबंधींच्या समस्या व संबंधीत विषयाच्या अनुषंगाने विविध कार्यक्रमाचे व परिषदांचे आयोजन केले जाते.  प्रतिष्ठानमार्फत राज्यातील अपंग व्यक्ती, संघटना, स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने विविध उपक्रम व कार्यक्रम राबविले जातात.  संपूर्ण महाराष्ट्रभर राज्य शासन, स्वयंसेवी संस्था, अपंग लाभार्थी यांचा समन्वय घडवून आणण्याचे कार्य सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखाली अविरत सुरु आहे.


महाराष्ट्र राज्याचे अपंगांसाठी धोरण :

भारत सरकारने संयुक्त राष्ट्रसंघाच्या अपंग व्यक्तींचे अधिकारांची संहीतेला (UN Convention on the Rights of the Persons with Disability -UCRPD) मान्यता दिलेली आहे. आणि अपंगत्व असलेल्या सर्व व्यक्तींच्या बाबतीतील सर्व मानवीहक्काचे व मुलभूत स्वातंत्र्याचे रक्षण करण्याचे व ते पूर्णतः अंमलात आणण्यास प्रोत्साहन देण्याची हमी घेतली आहे.  महाराष्ट्र राज्याकडून अपंगांसाठीचे धोरण अजून जाहीर झालेले नाही, ही बाब लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनाचा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, अपंग कल्याण आयुक्तालय, तसेच अनेक वर्षापासून या क्षेत्रात कार्य करणारेराज्यातील अपंग व्यक्ती, स्वयंसेवी संस्था, संघटना, तज्ञ व्यक्ती व सर्वंकष धोरणाचा मसुदा तयार करून मान्यता व अंमलबजावणीसाठी शासनास सादर करावा सर्व प्रवर्गातील अपंगासाठीचा धोरण मसुदा तयार करण्यात आला.


अपंगत्वावर मात करण्यासाठी सहाय्यक साहित्य.

राज्यातील एकूण १७ जिल्ह्यांमधील जवळ-पास ३०० अपंग व्यक्तींना फिरते कृत्रिम अवयव तपासणी व साधने वाटप केंद्र (मोबाईल व्हन) द्वारे पुनर्वसन विषयक सेवा उपलब्ध करून देण्यात आली. 

दि. ९ फेब्रुवारी ते २२जुलै २०१२ या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये अपंगांच्या प्रवर्गनिहाय तपासणी व मोफत साहित्य वाटप करण्यात आले.  तसेच दि. २६ मार्च पासून ३१ जुलै २०११ च्या कालावधीत विविध जिल्ह्यांमध्ये मोफत कृत्रिम अवयव तपासणी / वाटप शिबिराचे आयोजन करण्यात आले. 


शासनासोबत समन्वय

अपंग हक्क विकास मंचाच्या अथक प्रयत्नाने राज्याचे मा. मुख्यमंत्री. यांच्याकडे अपंगाच्या प्रलंबित प्रश्नासंबधी पाठपुरावा करून ६ महत्वपूर्ण प्रलंबित शासन निर्णय मंजूर करण्यात आले. राज्यातील मान्यता व अनुदान प्राप्त अशासकीय अपंगांच्या विशेष शाळा व कर्मशाळां मधील कर्माचायांना कालबद्ध योजना लागू करणे याबाबत २ निर्णय १३ ऑगस्ट २००९ रोजी पारित करण्यात आले.  या व्यतिरिक्त स्वयंरोजगारासाठी २०० चौ. फुट जागा मिळणेबाबतचा निर्णय शासकीय भूखंडावर बांधण्यात आलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थेमध्ये ३ टक्के आरक्षण तसेच वैद्यकीय प्रमाणपत्राचे सुसूत्रीकरण व अपंगांच्या शाळेला परिपोषण अनुदान देण्यात यावे.  इत्यादी शासन निर्णय मंचाच्या माध्यमातून मंजूर करवून घेण्यात आले.

संवाद व समन्वय

अपंगांचे हक्क आणि पुनर्वसन या क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या संस्था व अपंग व्यक्तींच्या संघटना यांसोबत सतत संपर्क साधणे व समन्वय ठेवणे याबाबतीत हा विभाग सतत पुढाकार घेत आहे. अपंगांचे पुनर्वसन, शासकीय योजना, अपंगांसाठी नविन तंत्रज्ञान व विविध क्षेत्रातील व्यक्तींचा सहभाग यांच्याशी संबंधीत विषयांवर चर्चासत्र, कार्यशाळा व बैठका नियमितपणे घेण्यात येतात. या द्वारे अपंगांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक संस्थांना मदत होत आहे तर नविन संस्था संघटना उभ्या राहत आहेत.

·    स्थानिक पातळीवर काम करणाऱ्या नवीन संस्थेची उभारणीः- सामर्थ्य अपंग सुशिक्षित सेवा सहकारी सोसायटी मर्यादित, वसई येथे स्थापना करण्यात आली. अपंग व्यक्तीना रोजगार स्वयंरोजगाराची निर्मिती करण्याकरिता स्वतः पुढाकार घेऊन सहकार्यातून प्रगती तथा सक्षम बनविण्याकरिता ही सेवा सहकारी संस्था कार्यरत राहील.

·         बाल अपंगत्व परिषदः- बालरोग तज्ञ, विशेष शिक्षक, मानसशास्त्रज्ञ, फिजियोथेरपिस्ट इत्यादींनी अपंगांच्या समस्येच्या काळानुसार बदलते स्वरूप लक्षात घेण्यसाठी९ वी राष्ट्रीय बाल अपंगत्व परिषद-२०१२’, नागपूर येथे दि. १४ आणि १५ सप्टेम्बरला आयोजित करण्यात आली.

·         स्वयं रोजगार मेळावेः- दि. २५ मार्च २०१२ व १ मे २०१२ रोजगार व स्वयं-रोजगार मेळावे

·         दि. ०४ आणि ०५ जानेवारी २०१० रोजी या कार्याशाळेमध्ये कायद्यातील तरतुदीनुसार अनुक्रमे, १) प्रतिबंधात्मक उपाय व वैद्यकीय पुनर्वसन २) शीघ्र तपासणी मार्गदर्शन व शालेय शिक्षण ३) अपंगाना उच्च व तंत्र शिक्षणात संधी ४) अपंगाना रोजगार व स्वयंरोजगार संधी ५) अपंगांचे सामाजिक, आर्थिक पुनर्वसन ६) अपंगाना सार्वजनिक ठिकाणी मुक्त संचार या प्रमुख विषयावर सादरीकरण व चर्चासत्रे झाली मंचाच्या पुढाकाराने हिस्लोपकोलेज, सिव्हीललाईन्स, नागपूर येथे अपंग पुनर्वसन क्षेत्रामध्ये असलेल्या करीअर संधी या विषयावर एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.

·         अभ्यास दौराः- आंतरराष्ट्रीय पातळीवर विकसित देशांतील अपंग व्यक्तीची शारीरिक, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक व राजकीय पुनर्वसन विषयक परिस्थिती जाणून घेण्यासाठी विविध सामाजिक व शासकीय संस्थांसोबत युरोप मध्ये अभ्सा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यामध्ये या क्षेत्रात काम करणाऱ्या १८ अपंग व्यक्ती सहभागी झाल्या होत्या.

खेळ आणि स्पर्धा

आपल्या अपंगत्वावर मात करून अनेक भारतीय व्यक्ती आंतरराष्ट्रीय पातळीवर अभिमानास्पद कामगिरी करीत आहेत. अपंग मुले व व्यक्तींच्या सर्वांगिण विकासामध्ये अशा व्यक्तींना खेळाच्या सुविधा मिळणे व त्यांचे खेळांतील कौशल्याला वाव देणे याकरीता विविध खेळांचे व स्पर्धांचे आयोजन करण्यात येते.

·         रविवार दि. ३ जून २०१२ रोजी श्री. शिवछत्रपती अॅडवेन्चर ऑर्गनायझेशन या संस्थेच्या सहकार्याने अपंग व्यक्तीमध्ये साहसी वृत्ती वाढावी तसेच पर्यावरण विषयक आवड निर्माण व्हावी या मुख्य उद्देशाने ऱॅलीचे आयोजन करून १८ वी राज्यस्तरीय साहसी रायगड प्रदक्षिणा मोहीम संपन्न झाली

·         नागपूर येथे तीन दिवसीय अखिल भारतीय मूक-बधीर क्रीडा परिषद आणि मूकबधिरांसाठी ६ वी राष्ट्रीय जलतरण स्पर्धा, नागपूर सुधार प्रण्यास जलतरण तलाव, अंबाझरी रोड, नागपूर येथे आयोजित करण्यात आली. 

·         विराटनगर मैदान येथे “Physically Challenge Cup-2009साठी अस्थिव्यंग अपंग व्यक्तीकरीता क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली.

·         दि. १९ जानेवारी २००८ रोजी अपंगांची पहिलीवहिली रायगड गिर्यारोहण मोहीम कडाक्याच्या थंडीत यशस्वीरीत्या पार पडली.