NEWS

यशस्विनी अभियान

यशस्विनी अभियान बद्दल:-

जागतिकीकरणाच्या आजच्या युगात स्त्रियांचे विश्वही खूप झपाट्याने बदलत आहे. शहरी भागात स्त्रियांसाठी कामाची निरनिराळी दालने उघडत आहेत. ग्रामीण भागातील स्त्रियासुद्धा स्वसबलीकरणाच्या दिशेने पाऊल टाकत आहेत. या स्त्रियांसाठीही व्यवसायाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. स्त्रियांनी जर त्यांची क्षमता, कौशल्य आणि व्यवसाय-उभारणीसाठी लागणाऱ्या भांडवलाची क्षमता लक्षात घेतली, तर एखादा लघुउद्योग सहज सुरू करता येऊ शकेल.

भारताच्या विविध भागांतल्या बचतगटांनी उत्पादन आणि प्रसिद्धी कौशल्याच्या बाबतीत आपली मोहोर उमटवली आहे. लहान लहान गावांतल्या स्त्रिया बचत गटांच्या माध्यमातून मुख्य प्रवाहाला जोडल्या गेल्या आहेत. बचत गटातील सहभागानंतर स्त्रियांच्या स्वच्छता, शिक्षण, आर्थिक स्वातंत्र्य आणि आर्थिक स्तर यात बरीच प्रगती पाहायला मिळतेय. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई, या संस्थेच्या वतीनं राज्यातल्या ८० टक्के बचत गटांचे सर्वेक्षण करण्यात आले. लहान गावांमध्ये तयार केलेल्या दर्जेदार उत्पादनांना सुयोग्य बाजारपेठ शोधण्याच्या हेतूने ही माहिती गोळा करण्यात आली. यादरम्यान सुप्रिया सुळेंनी अनेक जिल्ह्यांतील, अनेक तालुक्यांतील विविध बचतगटांशी संवाद साधला. त्यांच्यात एक नाते निर्माण झाले. या संवादातून त्यांना एक महत्वाची गोष्ट लक्षात आली, कर या बचत गटांच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनांची निर्मिती होते. मात्र योग्य बाजारपेठ मिळत नसल्याने किंवा या उत्पादनांची पुरेशी प्रसिद्धी करता न आल्याने बचत गटांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागत होता. त्यामुळेच महाराष्ट्रातील सव्वा दोन लाख बचत गटांना यशस्विनी अभियानाशी जोडण्याचा प्रयत्न आहे.

यशस्विनी अभियानाची सुरुवात आमच्या प्रेरणास्थान, स्त्रीसाक्षामीकरणाच्या उद्गात्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीच्या दिवशी म्हणजे ३ जानेवारीला २००८ साली झाली. अभियानाच्या कार्यक्षेत्रात सबंध राज्यभरातील बचतगट येतात. ६ राज्यस्तरीय समन्वयक, ६ विभागीय समन्वयक, ५४ जिल्हास्तरीय समन्वयक (बहुतांश महत्त्वाच्या जिल्ह्यांमधून प्रत्येकी २), ३५९ तालुकास्तरीय समन्वयक, असे सगळे मिळून ४२५ समन्वयक अभियानाचे काम पाहतात. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान गेल्या तीन वर्षांपासून राज्यातल्या विविध भागांतल्या बचत गटांच्या प्रश्नांविषयीची माहिती गोळा करत आहे.

 

संस्थापक

साधारण २००५ सालापासून सुप्रिया सुळेंनी दारिद्र्यरेषेखालील महिलांच्या विकासासाठी प्रत्यक्ष काम करायला सुरुवात केली. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा एक महत्त्वाचा उपक्रम असलेल्या यशस्विनी अभियानाच्या संस्थापक सुप्रिया सुळे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे महाराष्ट्रातल्या बचत गटांना चांगलीच चालना मिळाली. बचतगटांमध्ये काम करणाऱ्या स्त्रियांचे आरोग्य आणि शिक्षणविषयक प्रश्नसुद्धा भविष्यात हाती घेण्याचा सुप्रिया सुळे यांचा मानस आहे.

२००५ मध्ये यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबईचे अध्यक्ष श्री.शरद पवार यांनी बचत गटांना कमीत कमी व्याजदरानं कर्ज देण्याचा आणि त्यायोगे स्त्रियांच्या सक्षमीकरणाचा मुद्दा सर्वप्रथम हाती घेतला. त्यानंतर जेव्हा सुप्रिया सुळे यांनी यशस्विनी अभियानाच्या माध्यमातून या प्रश्नाला हात घातला तेव्हा त्यांनीही याचा पाठपुरावा केला आणि बचत गटांना दर माहा ४ टक्के दरानं कर्ज देण्याची मागणी केली. महाराष्ट्राच्या तत्कालीन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे त्यांनी याविषयीचे तपशीलवार सादरीकरण केले.

अखेरीस महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बचत गटांना ४ टक्के दरानं कर्ज देण्याचा प्रस्ताव पारीत झाला. या निर्णयामुळे राज्यातल्या २,२५,००० बचतगटांना आणि पर्यायाने २५,००,००० महिलांना लाभ होतोय. यशस्विनी अभियानाची ही ऐतिहासिक उपलब्धी म्हणावी लागेल.

अधिक माहितीसाठी भेट द्या: : http://yashaswini.org